कृषि आयुक्तालया मार्फत सुरु असलेल्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेत आदर्शगाव लाडची ता. जि. नाशिक या गावाचा समावेश सन २०२० साली झाला असून पद्मश्री डॉ. पोपटराव पवार साहेब यांनी या गावाला भेट देऊन या गावाची निवड आदर्शगाव योजनेत केली होती. तेव्हापासून सक्सेस ग्लोबल फाउंडेशन या संस्थेमार्फत या गावात विविध कार्यक्रम राबविले जातात. कृषी विभागाच्या समन्वयातून विविध उपक्रम सुरु आहेत. आदर्शगाव सप्ताह, कृषि सप्ताह, सप्तसूत्री पालन संदर्भात विविध अभियान, स्वच्छता अभियान, श्रमदान असे विविध उपक्रम सुरु आहेत. आदर्शगाव योजनेत प्रस्तावित असलेले घटकासंदर्भात महिलांना उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजन लाडची येथे करण्यात आले होते.
महाबँक आर सी टी (ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था) व सक्सेस ग्लोबल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्शगाव लाडची येथे ६ दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ६ दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सेंद्रिय शेती, नर्सरी (रोपवाटिका) प्रशिक्षण, मशरूम, मधमाशी पालन अशा विषयावर आदर्शगाव लाडची येथील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले बँकेचे अर्थसहाय्य देखील बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देता येणार आहे. महाबँक आर सी टी यांच्या माध्यमातून ३५४ वी बॅच लाडची येथे यशस्वी पूर्ण केली असून प्रशिक्षण दरम्यान त्यांना अँपरन, टोपी, प्रशिक्षण साहित्य महाबँक आर सी टी यांच्यामार्फत देण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप लाडची येथे आयोजित केला होता या समारोप दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नासा हनीवेल स्पेस एज्युकेटर (अंतराळवीर) मा. श्रीमती अपूर्वा जाखडी उपस्थित होत्या त्यांनी महिलांचे विज्ञान व अंतराळ जगतातील स्थान यावर प्रकाश टाकला तसेच आदर्श जिल्हा परिषद शाळा लाडची येथील विद्यार्थ्यांशी सवांद साधला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कृषि विभागाचे कृषि अधिकारी मा. डगळे साहेब यांनी कृषी विभागाच्या विविध योजना अन्न प्रक्रिया उद्योग यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून महाबँक आर सी टी संचालक मा. श्री. गणेश सरोदे साहेब यांनी व्यवसाय व व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी यावर सखोल मार्गदर्शन केले. सक्सेस ग्लोबल फाउंडेशन नाशिक संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन सोनवणे यांनी बचत गट, ग्रामसंघ विविध कल्याणकारी योजना समूहसंघटन या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक खाडे मँडम, आदर्श शाळा लाडची मुख्याध्यापक श्री. भामरे सर, श्री. थोरात सर, महाबँक आर सी टी प्रशिक्षक श्री. राजेंद्र पवार सर, श्री. समीर कुलकर्णी सर, आदर्शगाव लाडची सरपंच सौ. रेखा कडाळे, पोलिस पाटील श्री. सुनिल कडाळे, संस्थेचे सचिव श्री. राहुल महाजन, संस्था प्रतिनिधी सौ. वृषाली मोरे - वाघ, गोकुळ टोंगारे, प्रशिक्षण घेणाऱ्या महिला, बचत गट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.